
अमळनेर : सन २०२४-२५ खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा पीक विमा अजून मिळालेला नाही. विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
यावर्षी खरीप हंगामात सतत जास्तीचा पाऊस आणि मध्य हंगामात दूषित वातावरण यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले तर दूषित वातावरणामुळे कपाशीवर अज्ञात रोग आणि बोंड अळी यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. ओरिएंटेड इन्शुरन्स कंपनीच्या नियम व धोरणानुसार ४८ तासाच्या आत ऑनलाइन तक्रारी देखील केल्या आहेत. पीक विमा अधिकाऱ्यांनी नुकसानीचे स्पॉट पंचनामे देखील केले आहेत. ४ ते ५ महिने उलटूनही ओरिएंटेड इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही. कंपनी हेतु पुरस्कर विलंब करीत आहे. जिल्हाधिकारी पीक विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी याबाबत दखल घेऊन कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन !
त्याचप्रमाणे शासनाने थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन बोळवण केली जाते. तरी शासनाने भेदभाव न करता सरसकट कर्ज माफी द्यावी. जर शासन भेदभाव करेल तर कर्जमाफी साठी शेतकरी कर्ज भरणार नाहीत. आणि ३१ मार्च पर्यंत कर्ज माफी झाली तर पुढील वर्षी कृषी कर्ज मिळेल त्यामुळे २८ फेब्रुवारी पर्यंत कर्ज माफी नाही झाली तर हजारो शेतकरी २८फेब्रुवारीनंतर केव्हाही उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा दिलीप बाबुराव पाटील, मधुकर कौटिक पाटील, पंढरीनाथ बारीकराव साळुंखे, भास्कर कौटिक पाटील, पप्पू इच्छापूरकर व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे याना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक, निबंधक यांना देण्यात आल्या आहेत.