![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250129-WA0009-scaled.jpg?fit=1024%2C768&ssl=1)
अमळनेर : मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यांतर्गत अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे तक्रार निवारण दिन नुकताच आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत २०५ अर्जांपैकी ११९ अर्ज निकाली काढण्यात आले.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/1002687504.gif?resize=640%2C768&ssl=1)
जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला १०० दिवसांचा कृती आराखडा दिला असून या अंतर्गत सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात गुन्ह्यांचा निपटारा ,स्वच्छ पोलीस स्टेशन , नागरिकांना वेळेत न्याय , अन्याय दूर करणे , कर्मचार्यांवरील तणाव दूर करणे , नागरिक आणि पोलिसांमधील संबंध सुधारणे ,अद्ययावत दप्तर अशा अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठांकडे , अप्पर पोलीस अधीक्षक , डीवायएसपी व स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्ज ,तांत्रिक अडचणी निर्माण करणारे ,कौटुंबिक , आपसातील नातेवाईकातील वाद , शेतकऱ्यांचे प्रश्न , शेत रस्ते , बांधाचे वाद यात निर्णय घेणे पोलिसांना अवघड जाते. अनेक दिवस अशा अर्जावर निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होतो.
शासनाच्या आदेशाने अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. एकाच दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , डीवायएसपी आबासाहेब घोलप , पोलीस निरीक्षक विकास देवरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक बागुल , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्यासह विविध हेडकॉन्स्टेबल यांच्या समक्ष तक्रारदार वादी आणि प्रतिवादी अशा सर्वांना बोलावून दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी ११९ तक्रारी निकालात काढल्या. दोन्ही पक्षांची समजूत काढून योग्य अयोग्य भूमिका समजावून प्रकरणांचा निपटारा केला.