
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील जि.प. शाळा तांदळी व ग्रामपंचायत तांदळी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जि.प. तांदळी येथे राकेश प्रकाश पाटील व ग्रामपंचायत कार्यालय तांदळी येथे नवनियुक्त सरपंच रत्नाबाई सुनील परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थी गीत गायन, वेशभूषा, भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्या विद्यार्थ्यांना बक्षीस रूपात आशीर्वाद देण्यात आला.

गावाच्या सरपंच रत्नाबाई सुनिल परदेशी यांनी त्यांच्या स्वखर्चातून जि.प. सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. विजयसिंह इंदलसिंग परदेशी विकास प्रकल्प अधिकारी जळगाव) व सुनील इंदलसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून सदरील उपक्रम घेण्यात आला. अनपेक्षित रित्या गणवेश मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आनंद गगनात मावत नव्हता. गणवेश विद्यार्थ्यांना वाटप केल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक शंकरराव साहेबराव बोरसे व उपशिक्षक सुधीर शांताराम चौधरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती तांदळी यांनी शाळेच्या वतीने सरपंच यांचे आभार मानले. शेवटी ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील यांनी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृंद, पुरुष व महिला गावकरी बंधू-भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.