
अमळनेर : मधमाश्यांच्या हल्ल्यात एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी दुपारी साडे बारा वाजता जळोद येथे नदी काठावर घडली.

तालुक्यातील जळोद येथे स्व डॉ काकासाहेब देशमुख यांच्या ११ व्याची पूजा होती. ही पूजा नदी काठावरच करावी म्हणून पुजारी अमोल शुक्ल (वय ३८ रा पाठक गल्ली अमळनेर) यांनी सांगितले होते. जळोद येथे नदी काठावर पुलाखाली स्व देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या पोळे पर्यंत धूर पोहचल्याने मधमाशा भणकल्या. पूजेला बसलेल्याना चावल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले की पळू नका खाली झोपून घ्या त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच तोंडाला चावल्या. आधीच त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला म्हणून उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान इतर पाच ते सहा जणांना देखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले.