
पडताळणीत चुकीची महिती दिल्यास रेशनकार्ड रद्द होणार…
अमळनेर : शासनाच्या वतीने १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान अपात्र शिधा पत्रिका मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी फॉर्म भरून देताना खरी ,योग्य व अचूक माहिती सादर करावयाची आहे अन्यथा शिधा पत्रिका अपात्र ठरून रद्द होऊ शकतात. अमळनेर तालुक्यात २ लाख १३ हजार ६५८ नागरिक म्हणजे ७८.८२ टक्के नागरिक अन्न धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाने बोगस लाभार्थी शोध मोहीम सुरू केली आहे.
अनेक नागरिक अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे बोगस लाभार्थी आहेत. काहींची नावे दोन वेगवेगळ्या गावांमध्ये रेशन कार्ड मध्ये आहे. काहींनी नोकरी व इतर माहिती लपवलेली आहे. तर काही मयत लाभार्थी असताना त्यांच्या नावावर अन्न धान्य घेतले जात असल्याचेही शासनाच्या निदर्शनास आले असल्याने आता रेशन दुकानदाराकडे फॉर्म दिला जाणार असून रेशन कार्ड धारकांनी तो अचूक व सत्य भरून द्यायचा आहे. मृत लाभार्थी , बोगस लाभार्थी यांचे रेशनकार्ड अपात्र करून ते रद्द करण्यात येणार आहे. काही नागरिकांचे उत्पन्न एक लाखाच्या वर असतानाही त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे. अनेक लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढली आहे किंवा त्याच्या घरातील सदस्य नोकरीला लागले आहेत. तरी देखील ते लाभ घेत आहेत. अशा सर्व नागरिकांची पडताळणी होणार आहे. नागरिकांनी भरून दिलेले फॉर्म रेशन दुकानदार महसूल च्या पुरवठा विभागाकडे पाठवणार आहे. अन्नसुरक्षा ,अंत्योदय , केसरी ,शुभ्र असे सर्व रेशनकार्डांची तपासणी होणार आहे. चुकीचा लाभ घेतला असल्यास त्याचे रेशनकार्ड बदलवले जाणार आहे.
अमळनेर तालुक्यात अंत्योदय योजनेचे ८ हजार ७४६ रेशन कार्ड व त्यांचे युनिट ३५ हजार १५१ आहेत. तर प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड ४३ हजार ३७२ आहेत. त्यांचे युनिट १ लाख ७८ हजार ५०७ आहेत. तर पांढरे आणि केशरी मिळून १५ हजार ८५७ कार्ड धारक असून असे लाभार्थी युनिट धारक ५७ हजार ३९३ आहेत. एकूण ६७ हजार ९७५ रेशन कार्ड असून एकूण युनिट २ लाख ७१ हजार ५१ आहेत.
प्रतिक्रिया
नागरिकांनी आठवणीने आपल्या रेशन दुकानदाराकडे अर्ज भरून त्याला लागणारे कागदपत्र आणि अचूक माहिती सादर करावी. चुकीची माहिती दिल्यास त्याचे रेशनकार्डच रद्द होऊ शकते. रुकसाना शेख , पुरवठा निरीक्षण अधिकारी , अमळनेर
बोगस रेशनकार्ड ,बोगस लाभार्थी तपासणी मोहीम सुरू झाली असून ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. त्यांनंतर १५ जूनपर्यंत शासनाला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाणार आहे.-रुपेशकुमार सुराणा
रेशनकार्ड तपासणीत एका कुटुंबात अथवा एका पत्त्यावर एकच रेशनकार्ड दिले जाईल. एक लाखाच्या वर उत्पन्न असलेले सर्व पिवळे आणि केशरी रेशनकार्ड निलंबित केले जातील. नागरिकांनी एक वर्षाच्या आतील रहीवास पुरावा म्हणून आधार कार्ड , बँक पासबुक , वीज बिल ,फोन बिल, एलआयसी पॉलिसी , असे १० पुराव्यापैकी एक पुरावा सादर करणे अनिवार्य असेल- नितीनकुमार मुंडावरे ,उपविभागीय अधिकारी ,अमळनेर