
अमळनेर:- तालुक्यातील धुळे रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना रस्त्यांची आणि पुलांची झालेली दुर्दशा अपघातांना आमंत्रण देत आहे. धुळे बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला धुळे ते अमळनेर आहे. हायब्रीड अँम्युनिटी अंतर्गत झालेल्या रस्त्यावर विशेषतः अमळनेरपासून धुळे दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अनेक छोटे छोटे नाले, पूल आणि फरशी अरुंद असून, काही ठिकाणी संरक्षक रेलिंग तुटलेली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
जानवे गावाजवळ असलेली टेकडी फोडून तयार करण्यात आलेला रस्त्यावर छोटा पूल अरुंद आहे. वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांची चाहूल लागत नाही, त्यामुळे टक्कर होण्याची शक्यता अधिक आहे. अंधाराच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरते.
चोपडाई कोंडावळ गावाजवळील पूल अधिक धोकादायक बनला आहे. या पुलावरील लोखंडी रेलिंग काही महिन्यांपूर्वी तुटले असून, अजूनही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या ठिकाणी याआधीही अनेक अपघात घडले आहेत. नुकताच सप्तशृंगी देवीच्या यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांची इको गाडी याच पुलावर अपघातग्रस्त झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.
अमळनेरजवळील काही नाल्यांवरील फरशीसुद्धा खूपच अरुंद आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढल्यास वाहने सहज वाहून जाण्याचा धोका असतो. वाहतुकीच्या दृष्टीने हे भाग अत्यंत महत्त्वाचे असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
चोपडाई कोंडावळ गावासह परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे की, अरुंद पुलांचे तातडीने रुंदीकरण करावे, तुटलेले रेलिंग तात्काळ दुरुस्त करावे आणि अपूर्ण रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात घडू शकतो आणि त्याची जबाबदारी संबंधित खात्याची असेल, सदर विविध गावातील नागरिकांनी असा इशारा दिला आहे.
प्रतिक्रिया… हा रस्ता हायब्रीड अँम्युनिटी अंतर्गत झालेला असून त्या अंदाज पत्रकात छोटे मोठे फरशी पुलांचा समावेश नव्हता त्यामुळे रस्ता मोठा आणि अरुंद छोटे पूल यांच्या जवळ अपघात अधिक वाढले आहेत. हा धोका वाढला आहे. – धीरज इसे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे