
अमळनेर:- तालुक्यात सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यात्रेतील व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली.

गेल्या दोन महिन्यांपासून सूर्य आग ओतत आहे. तर आता मे हिटने अंगाची लाहीलाही होत आहे. तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे या वाढत्या तापमानाचा पाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात रविवारी हवमान विभागाने यलो अर्लट जारी केल्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोराच्या आकाराची ही गार असल्याने तीचा मारा मोठ्या प्रमाणावर होता. अनेक शेतकऱ्यांची बाजरी व मका कापून शेतात पडला असल्याने भिजून मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांनी धाब्यावर धान्य व इतर वस्तू सुकवण्यासाठी ठेवल्या असल्याने रात्री ते उतरवताना तारांबळ उडाली. रात्र असल्यामुळे नागरिक सुदैवाने वाचले. पण सध्या बोरी पात्रात यात्रोत्सव सुरू झाल्याने तेथील व्यावसायिक आणि काही भाविकांना त्याचा फटका बसला आहे.


