
पाण्याचे फवारे, लाखो लिटर पाणी वाया , भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत…
अमळनेर : एक जेसीबी मशीन ने बेकायदेशीर खोदकाम करताना २५० मिमी व्यासाची पाईपलाइन फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

अर्ध्या अमळनेर शहराला पाणी पूरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंदडा नगर मधून जाते. याच जलवाहिनीवरून काही पाण्याच्या टाक्या भरल्या जातात. १९ रोजी सकाळी जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पालिकेची पूर्वपरवानगी न घेता खड्डे खोदणे सुरू केल्याने मुख्य जलवाहिनी फुटली. बराच वेळ पाण्याचे कारंजे उडत होते. काही वेळाने ठेकेदाराने ते झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंदडा नगर भागात खोदलेल्या रस्त्यावर अक्षरशः नदी वाहत होती. लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाईपलाईन पूर्ण रिकामी झाली आहे.
आधीच मुंदडा नगर भागात रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून खोदलेला आहे. यापूर्वीही याच भागात खोदकामामुळे पाईप लाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होऊन रस्त्यावर चिखल झाला होता. नागरिकांना १२ ते १५ दिवस पाणी मिळाले नव्हते.
प्रतिक्रिया….
जिओ कंपनीची केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने आमची परवानगी न घेता खोदकाम केल्याने हा प्रसंग उद्भवला. त्याचे जेसीबी जप्त करण्यात येईल. जर पालिकेची परवानगी घेतली असती तर पालिकेचे अभियंते हजर राहिले असते. भर उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले नसते.- तुषार नेरकर, मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर
पाईप जोडण्यासाठी साहित्य घेण्यासाठी तातडीने कर्मचारी धुळ्याला रवाना केला आहे. रात्री उशिरापर्यंत पाईप जोडून काँक्रीट टाकून पक्के केले जाईल. मात्र पाणी पुरवठा नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिराने होईल. प्रवीण कुमार बैसाणे, अभियंता ,पाणीपुरवठा विभाग अमळनेर नगरपरिषद