
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, चार तलवारी जप्त
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे खु. येथे मुलांवर तलवारी उगारून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

फिर्यादी निखिल रतीलाल पाटील (रा. गलवाडे) हा ३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाबाहेर क्रिकेट ग्राऊंडवर खेळत असताना शेखर शेषराव पाटील याने मैदानावर बैलगाडी आणली. मुलांनी त्याचा जाब विचारला असता गाडीत बसलेले चंद्रशेखर शेषराव पाटील, दीपक नारायण पाटील, तेजस नामदेव पाटील (तिघे रा. गलवाडे खू.), उमाकांत दगडू भदाणे (रा. भोकरवाडी ता.जि. धुळे ) हे गाडीखाली उतरले व गोणीत ठेवलेल्या तलवारी काढून चंद्रशेखर याने फिर्यादीवर उगारली. तेव्हा त्याने तलवार हाताने अडवल्याने उजव्या हाताला जखम झाली आहे. तसेच त्यांनी फिर्यादी व त्याच्या लहान भावाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या काकाने त्या ठिकाणी येऊन त्याच्याकडून चार ही तलवारी घेऊन मारवड पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. चारही जणांविरूद्ध विनापरवाना शस्त्र बाळगणे व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.


