
अमळनेर : पालिकेच्या भूखंड १२३ मधील मुख्य रस्त्यालगतची ३८ अतिक्रमणे पालिकेने काढण्यास सुरुवात करताच दुकानदारानी स्वतःहून काढून घेतली आहेत. यामुळे भाजीपाला मार्केट कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. नागरिकांनी पालिकेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

पालिकेच्या मालकीच्या असलेल्या १२३ भूखंडात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. त्यात मुख्य रस्त्यावर दुकाने अतिक्रमित असल्याने सामान्य नागरिकांना मुख्य बाजारपेठेत भाजीपाला , किराणा व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदीला जाताना त्रास सहन करावा लागत होता. पालिकेने १२३ मध्येच ८६ व्यापारी गाळे बांधून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ३८ दुकानदारांनी तात्पुरत्या स्वरूपात आपली दुकाने जैसे थे ठेवली होती.

व्यापारी गाळे बांधले जाऊनही अतिक्रमण काढले गेले नाही. प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असल्याने अखेर पालिकेने काही दिवसांपूर्वीच या दुकानदाराना नोटिसा दिल्या होत्या. तरीही अतिक्रमण हटवले नाही. चार दिवसांपूर्वी तोंडी सूचना देण्यात आल्या. दुकानदारांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर मुख्याधिकारी तुषार नेरकर , अभियंता डिगंबर वाघ , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , अविनाश बिऱ्हाडे , जितू चावरीया ,विशाल सपकाळे , सुनील संगेले , बुद्धाभूषण चव्हाण , जतीन चव्हाण , कमलेश पाटील, विकास बिऱ्हाडे यांचे पथक सकाळी १२३ मध्ये दोन जेसीबी मशिनसह पोहचले आणि अतिक्रमण काढायला सुरुवात करताच दुकानदारांनी मालाचे व दुकानांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढायची तयारी दर्शवली. दुकानदारांनी आपापली दुकाने खाली करून दुकानांचे पत्रे ,अँगल काढणे सुरू केले. सायंकाळी नन्तर पालिकेने पक्के ओटे व बांधकाम पुन्हा तोडून साफ केले.
शहराचा वाढता विस्तार पाहता वाहतुकीची सर्वत्र कोंडी होत असल्याने पालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी गांधीनगर , झामी चौक आणि त्यांनतर १२३ भूखंडातील अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी स्वागत केले आहे. पालिकेने या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता बाळगावी अशीही मागणी होत आहे.

