राज्याच्या मंगलमयतेसाठी सोडला संकल्प…
अमळनेर :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री
धनंजय मुंडे ७ एप्रिल रोजी येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराला भेट दिली. यावेळी राज्यात जे काही अमंगल असेल ते दूर होऊन राज्याचे सर्वार्थाने मंगल व्हावे यासाठी श्री. मुंडे यांनी मंदिरातील पुरोहित गणेश जोशी यांच्याकडून श्री मंगळदेव ग्रह देवतेसह , श्री भूमीमाता व पंचमुखी हनुमानाचे विधिवत पूजन करून संकल्प सोडला. त्यानंतर मंदिर परिसरातील अभिषेकालयासह विविध भागांची त्यांनी पाहणी करून श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या वैशिष्ट्यंची माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, महिला शहराध्यक्षा अलका पवार, एस.टी. महामंडळातील कामगार नेते एल. टी. पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समितीच्या सदस्या रिटा बाविस्कर, रंजना देशमुख, खा. शि. मंडळाचे संचालक डॉ.अनिल शिंदे , पं. स.चे माजी सभापती भोजमल पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम यांनी श्री. मुंडे यांचा शाल, श्रीफळ व श्री मंगळदेव ग्रहाची प्रतिमा देऊन सत्कार केला.