
बोदर्डे येथे वाळूचोरांचा दांगडो, ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर घ्यायला पोहचले तहसीलदार…
अधिकाऱ्यांच्या धरसोड वृत्तीचा आला आजही प्रत्यय, मुरुम व वाळूचोरास दिले अभय…
अमळनेर:- तालुक्यातील बोदर्डे येथे महसुलच्या पथकाऐवजी ग्रामस्थांनीच वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल विभागाकडे आयते सुपूर्द केले आहे, दरम्यान वाहन चालक व मालकांनी ग्रामस्थांशी यावेळी हुज्जत घातल्याने मोठा वाद झाला होता.

यावेळी झालेल्या वादाचा व कारवाईचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल होत असला तरी महसुलाच्या धरसोड वृत्तीचा आजही प्रत्यय आला आहे. पावसाच्या रिप रिप मध्ये महसूल विभागाने बोदर्डे येथे जाऊन ग्रामस्थांनी पकडून ठेवलेले आयते ट्रॅक्टर ताब्यात घेतले, मात्र परत येताना गलवाडे रस्त्यावरील मंगल कार्यालयाजवळ एक मुरूमचे डंपर आणि एक वाळूचे डंपर रस्त्यावर आढळून आले. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. महसुलच्या अशा धरसोड वृत्तीमुळे त्यांचे खिसे गरम होत असले तरी वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. आता बदलीचे वेध लागल्याने वरिष्ठ अधिकारी मिळेल तेवढे गुंडाळण्यामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र पुन्हा असे निष्क्रीय व कर्मचाऱ्यांवर वचक नसलेले अधिकारी तालुक्याला लाभले तर तालुक्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.
अनेक ठिकाणी वाळूचा साठा पडून…
एकही वाळू ठेका सुरू नसताना, शहर आणि तालुक्यात मोठं मोठी बांधकामे सुरु आहेत, अमळनेर शहरात बांधकामे सुरू असलेल्या अनेक ठिकाणी वाळूचा साठा पडून आहे, महसूल विभागाने स्पॉट वर जाऊन खात्री केल्यास निश्चितच दंडाची मोठी रक्कम शासन जमा होउ शकते. शहरातील सर्वच बांधकामाच्या ठिकाणी वाळूचा अवैध साठा आहे असे नाही मात्र घर मालकाकडे रॉयल्टीची पावती मागीतली तर कोणत्या ठिकाणी वाळूचा अवैध साठा आहे, किती आहे, आणि तो कोणत्या वाळू माफियाने टाकला याबाबत देखील माहिती मिळू शकते मात्र तलाठी अप्पा तेवढी तसदी घेताना दिसत नाही किंवा सर्वसामान्य नागरिकांना वाळू साठा दिसतो, मात्र तोच साठा महसूलच्या कर्मचाऱ्यांना माफियांनी बांधलेल्या अर्थपूर्ण पट्टीमुळे दिसत नाहीये.

