
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित,कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
गांधी विचार संस्कार परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यात द्वितीय वर्ष कला वर्गाची विद्यार्थिनी कु. किरण गणेश साळुंखे या विद्यार्थिनीला सुवर्णपदक प्राप्त झाले. या कार्यक्रमाप्रसंगी गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. सतीश पारधी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेविषयी आपली भूमिका मांडून महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी कु. किरण गणेश साळुंखे हिचा गुणगौरव केला. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम विद्यार्थ्यांनी भावी जीवनात करावे. विद्यार्थी जीवनात सत्य, अहिंसा याचा अंगीकार करून देशासाठी आपली सेवा द्यावी असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. दरवर्षी गांधी रिसर्च फाउंडेशन ने गांधी विचार संस्कार परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांनसाठी केल्याबद्दल आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.व्ही.डी पाटील उपस्थित होते. ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील,सेक्रेटरी देविदास बारकू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सुवर्ण पदक विजेती किरण साळुंखे हिचे अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.







