पोलीस ठाण्यावर प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा…
अमळनेर:- तालुक्यातील कलाली गावात दारूबंदी व्हावी म्हणून गावकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून १८ मे रोजी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कलाली गाव व परिसरात गावठी दारू विक्री सुरू असून अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. या दारूच्या व्यसनामुळे १५-१६ कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असून अनेक तरुण ही दारूच्या आहारी गेली आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून ग्रामस्थ दारू बंदी व्हावी म्हणून प्रयत्न करत असून ही दारू विक्री करणारी मंडळी कायद्याला ही जुमानत नाहीत. खुले आम दारू विक्री, दारू वाहतूक, काळ्या गुळाची वाहतूक, सर्वांच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. गावात दारूबंदी होण्यासाठी कठोर पावले उचलावीत या मागणीसाठी कलाली ग्रामस्थ १८ मे रोजी सकाळी १० वाजता गोवर्धन गावाजवळ जमणार असून तेथून लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात मारवड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात येणार आहे. व दारूबंदी बाबत निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.