
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी “जागतिक आदिवासी दिवस” व “ऑगस्ट क्रांती दिन” साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश पारधी व हिंदी विभाग प्रमुख प्रा. डाॅ. संजय महाजन हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी हे उपस्थित होते
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी आदिवासींचे मूलभूत अधिकार व बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आढावा मांडला. जल, जंगल आणि जमीन हा आदिवासींचा मूलभूत अधिकार होता आणि त्यावर ब्रिटिशांनी हस्तक्षेप केल्यामुळे कशी दुर्दशा झालेली आहे यावर विशेष प्रकाश टाकला. तसेच आदिवासी बांधवांना आपलेपणाची वागणूक देऊन त्यांना प्रगत समाजाबरोबर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या विषयाची जाणीव व जागृती करणारे विचार आपल्या व्याख्यानातून त्यांनी मांडले. तर क्रांती दिनानिमित्त डॉ. संजय महाजन यांनी भारतीय स्वातंत्र्य क्रांतीचा साहित्यातुन इतिहास मांडला. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील शहीद झालेल्या क्रांतीकारकांचे स्मरण केले. याप्रसंगी कु. मोनाली बडगुजर व कु. हर्षदा पाटील या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थीनींना राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप केले गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वसंत देसले सर यांनीही आदिवासी बांधवांच्या प्राचीन, थोर पराक्रमाच्या परंपरेचा उजाळा करत, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांती आंदोलना विषयी मार्गदर्शन करीत सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय महाजन यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महीला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

