
अमळनेर:- तालुक्यात गेल्या २० दिवसांपासून पावसाने पूर्णतः पाठ फिरविल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. मका, सोयाबीन, मूग, कापूस, उडीद, बाजरी, ज्वारी यांसारखी पिके पाण्याअभावी करपू लागली असून पानांची पिवळसर रंग बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून सुमारे ७० टक्के पिके वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस न झाल्याने काही पिके वाळण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती सतावत आहे. स्थानिक शेतकरी सांगतात की, जर पुढील काही दिवसांत पावसाची सर आली नाही, तर खरीप हंगाम हातातून जाईल.
पिकांचे रक्षण करण्यासाठी बोअरवेल व विहिरींचा आधार घेतला जात असला तरी जलसाठा संपत आल्याने तातडीने सिंचन करणे कठीण झाले आहे. काही शेतकरी फवारणीसाठी पाणी आणण्यास देखील त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी महागडी खते, औषधे आणि दर्जेदार बी-बियाणे खरेदीसाठी मोठा खर्च केला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा खर्च मातीमोल होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामानाने साथ न दिल्यास कर्जाचा बोजा फेडणे कठीण होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे. आतापर्यंत एकही असा पाऊस झाला नाही की शेतातून पाणी वाहून जाईल. विहिरींनाही पाणी नाही. शासनाने तातडीने कृत्रिम पावसाची योजना राबवून शेतकऱ्यांना जीवदान द्यावे, अशी मागणी प्रा. सुभाष पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रल्हाद पाटील आणि मुरलीधर पाटील यांनी केली आहे. शेतकरी वर्ग पावसाची चातकासारखी वाट बघत असून, लवकरच पावसाची सर आली नाही तर अमळनेर तालुक्यातील खरीप हंगामाचा पूर्ण वाया जाण्याची शक्यता आहे.




