
संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सन्मान…
अमळनेर : येथील रहिवाशी आणि मुंबई येथील एट्लस तंत्रकौशल्य विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा संचालक .डॉ. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीच्या जागतिक प्रतिष्ठित अभ्यागत कार्यक्रम २०२५ (डिस्टिंग्युशड व्हिजिटर प्रोग्राम ) मध्ये निवड झाली आहे. हा अत्यंत प्रतिष्ठित सन्मान असून, जगभरातील तंत्रज्ञ व व्याख्याते यांची त्यात गणना होत आहे.
आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीकडून मिळालेल्या अधिकृत पत्रानुसार, 140 हून अधिक तंत्रज्ञान नेत्यांच्या नामांकनांमधून केवळ 20 जणांची निवड करण्यात आली आहे. या यादीत डॉ. पाटील यांचा समावेश असणे हे त्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचे प्रतीक आहे.
प्रतिष्ठित अभ्यागत कार्यक्रम काय आहे?
आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीचा डिस्टिंग्युशड व्हिजिटर प्रोग्राम हा एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे जो जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ अन व्याख्याते आणि इनोव्हेटर्सना विविध अध्यायांसोबत जोडतो. दरवर्षी नवीन विषयांची निवड करून, तंत्रज्ञानातील नवीनतम बदलांना अनुसरून हा कार्यक्रम सुरू ठेवला जातो.
डॉ. शशिकांत पाटील यांची या प्रतिष्ठित यादीत निवड होणे भारतीय तंत्रज्ञान समुदायासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांना व्यक्तिशः तयार केलेले डिस्टिंग्युशड व्हिजिटर कॉईन (नाणे) मिळणार आहे. नियुक्तीचा प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. विविध अध्यायांच्या विनंतीनुसार भाषणे आणि तांत्रिक चर्चा करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीच्या विद्यार्थी आस्थापनांना १५०० डॉलर्स पर्यंतचे अनुदान प्राप्त होणार आहे.
या नियुक्तीमुळे डॉ. पाटील जगभरातील आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीच्या व्यावसायिक आणि विद्यार्थी आस्थापनांना भेट देऊन तंत्रज्ञानावर चर्चा व्याख्यान व सादरीकरण करू शकतील. त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव नवीन पिढीच्या तंत्रज्ञांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मंच ठरेल. आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीने डॉ. पाटील यांचे अभिनंदन करत असे म्हटले आहे की, त्यांच्यासारख्या तंत्रज्ञानप्रेमी अन व्यासंगी व्यक्तींमुळेच समुदायाची प्रगती होत राहते.

