अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात जात असताना चक्कर येवून पडल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना दि. २६ रोजी घडली आहे. सदर शेतकऱ्यास उष्माघाताचा त्रास होत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डांगरी येथील शेतकरी भगवान भिका बडगुजर हे दिनांक २६ मे रोजी सकाळी ९ वाजता मोटारसायकलीने शेतात जात असताना अचानक चक्कर येवून जमिनीवर पडले. त्याच रस्त्याने अनिल शिसोदे हे येत असताना त्यांना भगवान बडगुजर खाली पडलेले दिसल्याने त्यांनी गावात फोन करून त्यांना अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दुपारी १२:४५ वाजता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. सतत उन्हात काम करत असल्याने त्यांना २३ दिवसांपासून उष्माघाताचा त्रास होत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते शेतात जात असल्याचे त्यांच्या पुतण्याने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनील तेली हे करीत आहेत.