
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा येथील रहिवासी असलेले माजी प्राचार्य मगन सूर्यवंशी यांना महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक उपक्रम धोरण 2016 अंतर्गत सामाजिक संस्थामार्फत दिला जाणारा पुरस्कार स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव निमित्त आधार भारत परिवर्तन परिषदेतर्फे राज्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आधार रत्न-लाईव्ह टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.
सदरहू पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक उपक्रम धोरण 2016 अंतर्गत सामाजिक संस्थाकडून दिला जातो. प्राचार्य मगन सूर्यवंशी यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, जलसंधारण, वृक्ष लागवड व साहित्यिक क्षेत्रात केलेलं कार्य पाहता त्यांना आधार रत्न या संस्थेकडून सन 2021-22 चा लाईफ टाईम आचिव्हमेंट अवॉर्ड स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव निमित्त डोंबिवली येथे आयोजित सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.अमित दुखंडे यांच्या हस्ते देण्यात आला. सूर्यवंशी यांचे कार्य पाहता त्यांचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी आधार भारत परिवर्तन परिषद नामांकन पाठविणार असल्याचे डॉ.अमित दुखंडे पुरस्कार प्रदान करतेवेळी म्हणाले. मगन सूर्यवंशी यांच्या पुरस्काराने पातोंडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.







