
एकाविरुद्ध गुन्हा दाखल, २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज जप्त
अमळनेर : पिकअप गाडीमध्ये तीन बैल निर्दयीपणे कोंबून बेटावदहुन जळगाव कडे नेताना गोरक्षकांनी त्यांना पकडून दोंडाईचा येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडून तीन गुरे व वाहन असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बेटावद येथील गोरक्षक पुरुषोत्तम जयपाल पवार याला माहिती मिळाली की , ३१ रोजी दीड वाजेच्या सुमारास एका पीक अप व्हॅन मधून बेटावद कडून गुरांना कोंबून निर्दयीपणे वाहतूक केली जात आहे. म्हणून पुरुषोत्तम व दिनेश माळी हे अमळनेर रस्त्यावर हॉटेल पांझरा जवळ थांबले असता त्यांना पीक अप व्हॅन क्रमांक एम एच १८ ए ए ५६४८ येताना दिसली त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वाळवून बेटावद कडे वळवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी त्याचा मोटरसायकलवर पाठलाग केला असता बेटावद च्या मंदिराजवळ त्याने पिकअप व्हॅन थांबवली. गाडीच्या मागे फळ्या होत्या आणि गाडी हिरव्या प्लास्टिक ने झाकलेली होती. दोघांनी वर चढून पाहिले असता तीन बैल दोराने बांधलेले होते. चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांनी ते वाहन पकडून मारवड पोलीस स्टेशनला आणून जमा केले. चालक तुषार संतोष पाटील (वय ३४ रा मालपूर, शिवाजी राजे चौक दोंडाईचा ता शिंदखेडा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याजवळील ४२ हजार रुपयांची गुरे आणि अडीच लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.




