
अवैध धंदे करून गल्ला भरलेले पाहतायेत नगरसेवक बनण्याचे स्वप्न…
अमळनेर:- शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच कधी न दिसणारे माजी, भावी, युवा, इच्छुक उमेदवार जनतेच्या नजरेस पडू लागले असून यात दोन नंबरवाल्यांचाच भरणा अधिक असल्याचे दिसून येते आहे.
गेल्या तीन चार विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक काळातले अर्थकारण मोठ्या प्रमाणावर वाढले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा उच्चांक गाठला गेला. त्यांचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर ही होणे अपरिहार्य आहे. सर्व काही आर्थिक बाबींवर अवलंबून आहे असा समज अनेकांचा झाल्याने अवैध धंदे करून गल्ला भरलेले नगरसेवक पदाची स्वप्न पाहत आहेत. ऑनलाईन जुगार, सट्टा, दारू वाले पूर्ण जोशाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आर्थिक बाबतीत बलाढ्य असल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा आविर्भावात असल्याने त्यांना आताचा नगरसेवक झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेते मंडळी फक्त आर्थिक बाबतीत मातब्बर म्हणून उमेदवारी देणार की इतर कसोटीवर ही उतरवून उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण दिलेल्या उमेदवारांवरच नेत्याची ही प्रतिमा उजळणार की डागाळणार हे ठरणार आहे.




