तालुक्यातील शिरूड येथे घडली धक्कादायक घटना…
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथे माहेरी राहत असलेल्या ३२ वर्षीय विवाहितेने आपल्या पाच वर्षांच्या मुलाचा गळा आवळून स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पूर्वी दीपक पाटील असे विवाहितेचे नाव असून मुलाचे नाव वृषांत दीपक पाटील आहे. सदर विवाहितेचे सासर नंदुरबार येथील असून कौटुंबिक वादामुळे सदर विवाहिता माहेरी शिरूड येथे आपल्या मुलासह राहत होती. काल दिनांक १७ रोजी विवाहितेचे वडील वसंत पाटील हे सकाळी उठल्यावर वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना आपली मुलगी दोरीने गळफास घेतलेल्या स्वरूपात व नातू झोपलेला दिसून आला. दोघेही मृत झाल्याचे समजल्याने मोठा आक्रोश सुरू होता. दरम्यान संबंधित विवाहितेने इंग्रजीत चिठ्ठी लिहिली आहे. त्यात मृत्यूस आपण स्वतः जबाबदार असून सासरच्यांना अंत्यसंस्कारास ही बोलवू नये असे लिहल्याचे समजते. पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर विवाहिता व चिमुकल्याच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.