
अमळनेर : रब्बी हंगामाच्या पीक पाहणी बाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करीत आहेत. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अमळनेर तालुक्यात फक्त १३ टक्के पीक पाहणी झाली आहे.
खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामाची देखील पीक पाहणी केली पाहिजे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी याबाबत अनभिज्ञ आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या पिकाची ऑनलाइन नोंद सात बारा वर मुदतीत केली पाहिजे. वेळेवर पीक पाहणी केल्यास पीक विमा , पीक कर्ज , नैसर्गिक आपत्ती , एम एस पी , नुकसान भरपाई ,अनुदान व विविध प्रकारचे शासकीय लाभ शेतकऱ्यांना मिळतील.
शासनाने ऍपवर सुविधा केल्याने शेतकरी स्वतः आपल्या शेतातून भ्रमणध्वनीवर पीक पाहणी करू शकतात. खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना याबाबत जाणीव नाही. फक्त वार्षिक पिकाला पुन्हा पीक पाहणी करायची गरज नाही.
उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आपल्या मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी भरवस ,पाडळसरे येथे जाऊन पीक पाहणी केली त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची जनजागृती करून मार्गदर्शन केली. यावेळी भरवस मंडळाधिकारी आर जे बेलदार,ग्राम महसूल अधिकारी , बामणे येथील ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई , पोलीस पाटील कपिल पाटील हजर होते.
शेतकऱ्यांनी त्वरित पीक पाहणी ऍप वर पीक पेरा लावून घ्यावा अन्यथा शासनाचे कोणतेही लाभ मिळणार नाही. लोकप्रतिनिधी , शेतकरी नेते व समाज सेवकांनी याबाबत जनजागृती करावी- मयूर भंगाळे , उपविभागीय अधिकारी अमळनेर
ग्राम महसूल अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पीक पाहणीची अंतिम मुदत २६ जानेवारी पर्यंतच असल्याने शेतकऱ्यांनी तत्परतेने नोंद करावी- रुपेशकुमार सुराणा ,तहसीलदार अमळनेर




