
अमळनेर : घरातील लोक मजुरीला गेले असता दोन कुटुंबातील साडे सोळा वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथे घडली.

तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथील एक इसम व त्याचा भाचा समोरासमोर आपापल्या कुटुंबासह राहतात. २६ रोजी सकाळी आठ वाजता दोन्ही कुटुंबातील सदस्य शेती कामासाठी निघून गेले. दोन्ही घरात साडे सोळा वर्षाच्या मुली एकेकट्या घरी होत्या. सायंकाळी दोन्ही कुटुंब सहा वाजता कामावरून घरी परतल्यावर त्यांना दोन्हीही मुली घरी दिसल्या नाहीत. दोन तीन दिवस आपल्या नातेवाईकांकडे शोध घेतल्यावरही मुलींचा शोध लागला नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांना फुस लावत फसवून पळवून नेल्याचा संशय पालकांना आल्यावर त्यांनी अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाची तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




