
अमळनेर : तालुक्यात धुरखेडा व शहापूर या दोन ठिकाणी आगी लागून सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाले आहे.

अनिल पंडित बाविस्कर रा अष्टभुजा नगर जळगाव यांचे तालुक्यातील नारणे धुरखेडा शिवारात गट नम्बर ५० मध्ये शेत असून २५ रोजी सायंकाळी ६ वाजता शेतातील गोदामाला अचानक आग लागली. आगीत साडे चार लाख रुपये किमतीच्या ठिबक नळ्या , अडीच लाख रुपये किमतीच्या १३ सोलर प्लेट आणि ४० हजार रुपये किमतीचे ८० पीव्हीसी पाईप व इतर साहित्य असे सात लाख चाळीस हजार रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले. अनिल बाविस्कर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल योगेश बागुल करीत आहेत.
तर ३० रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातील शहापूर येथे गट नम्बर ४४ मध्ये कैलास बाबुराव पाटील यांच्या शेतात वादळाने तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले. शेतात काढलेल्या मका आणि चाऱ्यावर ठिणगी पडल्याने कणसे व चारा पेटला. आग पसरली आणि ३ एकर शेतातील ५० ते ६० क्विंटल मका , चारा आणि शेतात अंथरलेल्या ठिबक नळया सह पीव्हीसी पाईप असे साहित्य जळून खाक झाले. आजूबाजूच्या लोकांनी निंबाच्या झाडाच्या फांद्या व टँकर मागवून आग विझवली. याबाबत मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत




