परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर…

अमळनेर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील खापरखेडा येथील चंद्रकांत जुलाल सोनवणे (वय 23) हा कामगार अमळनेर येथे कोर्टाजवळील गजानन नगर येथील कामावर आला होता. दिवसभर काम सुरू होते. मात्र दुपारी स्लॅबच्या प्लेट काढत असतांना त्याचा तोल गेला व तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. खाली पडताच आजूबाजूच्या लोकांनी व कामावर असणाऱ्या त्याच्या मित्रांनी त्याला उचलून अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जबर मार लागल्याने तो उपचारापूर्वीच मृत झाला. तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की चंद्रकांत हा जागेवरच ठार झाला होता. चंद्रकांत सोनवणे हा अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी असून तो परिवारासह मित्रांचा लाडका होता. अत्यंत मनमिळाऊ मित्र हरपल्याने सर्वांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. त्याच्या पश्चात फक्त दोन वर्षांची मुलगी असून आठ महिन्यांची गर्भवती असलेली पत्नी तसेच आई, वडील, 2 भाऊ असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण खापरखेडा गावसह परिसरात शोककळा पसरली आहे. ठेकेदाराने कामगारांना कामावर सेफ्टी किट देणे किंवा परिधान करणे गरजेचे आहे. दरम्यान शहरात अनेक वैध – अवैध बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी काम करीत असणाऱ्या कामगारांना त्यांच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात का ? याची कामगार मंडळासह संबंधित यंत्रणांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.




