
आमदारांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील वि.का. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 2022 ही नुकतीच बिनविरोध पार पडली, या निवडणुकीत गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तींना प्रतिनिधित्व द्यावे यासाठी ग्रामस्थांकडून प्रयत्न करण्यात आला तसेच जे आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य किंवा विकास सोसायटी चे संचालक झाले नाहीत अशा लोकांना यावेळी संधी देण्यात आली. यात मुस्लिम समाजातील उच्च शिक्षण घेतलेल्या शेख फारुख हाजी अ.रज्जाक यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या इतिहासात पहिल्यांदा मुस्लिम समाजातील व्यक्तीला मान मिळाल्याने त्यांचा सत्कार अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लतीफ पठाण, मुशीर शेख व शिक्षनोत्तेजक मंडळ चेअरमन, मा सरपंच नारायण कोळी यांनी त्यांचा नागरी सत्कारचा कार्यक्रम दिनांक 16 रोजी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार अनिल पाटील हे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक शेख फारुख हाजी अ.रज्जाक यांचा सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच चेअरमन ,व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांचा देखील सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच विनायक अण्णा बडगुजर हे होते तर कार्यक्रमाला सर्व आजी माजी सरपंच,सोसायटी चेअरमन, संचालक उपस्थित होते तर सूत्रसंचालन किरण बडगुजर सर यांनी केले.




