मनमिळाऊ, कष्टाळू महेशच्या मृत्यूने गावकरी हळहळले…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील छत्रपती शिवाजी चौक मधील रहिवासी अशोक पवार यांचा कनिष्ठ लहान मुलगा महेश (वय-27) याचा न्यूमोनिया सारख्या अल्पशा आजाराने अवघ्या एकच दिवसांत मृत्यु झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून प्रत्येकाच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या बांध फुटताना दिसून येत होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महेशच्या कुटुंबात आई, वडील, दोन विवाहित बहिणी,एक अविवाहित मोठा भाऊ असा परिवार आहे.कुटुंब हलाखीचे त्यात वडील मानसिक आजाराने त्रस्त अशा परिस्थितीत लहानपणापासून भारतीय सैन्याबद्दल असलेली आत्मीयता व भारतीय सैन्यातच दाखल होऊन भारत मातेचे ऋण फेडण्यासाठी त्याचे स्वप्न उराशी होते. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा व दवाखान्याचा खर्च पेलत तो नियमित व्यायाम व अभ्यास करत होता.अनेक सैन्य भरतीच्या मेळाव्यात त्याला अपयश आले पण तो कधी खचला गेला नाही. त्याची झुंज सुरूच होती. शरीरयष्टीने फिट व देखणा असा त्याचा स्वभाव होता. मित्रांच्या सुख-दुःखात तो स्वतःहून धावून येण्याचा त्याचा स्वभाव, प्रत्येकाच्या हाकेला धावून मदतीला तत्पर असणारा मित्रांच्या गळ्यातील ताईद असणारा असे अनेक गुण त्याच्यात होते.काही वर्षांपासून सैन्य भरती मेळावे होत नसल्याने कुटुंबाचे ओझे त्याच्यावर होते म्हणून खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता.अशीच मेहनत करत त्याने मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट महामंडळ मध्ये त्याने चालकाची नोकरी देखील मिळवली होती. आणि स्वतःचे चारचाकी वाहन घेऊन त्याने खाजगी कंपनीत गाडी लावली होती. रात्रंदिवस तो वाहने चालवून मेहनत घेत होता. सर्व काही आलबेल होत असताना अचानक त्याच्यावर क्रूर नियतीने घाला घातला आणि कोणाच्या स्वप्नातही विचार आला नसेल अशी वेळ मृत्यूने त्याच्यावर आणून ठेवली. काही दिवसांपूर्वी तो मुंबईहून घरी आला होता. त्यावेळी त्याला थोडे अस्वस्थ वाटत होते.पण पावसाचे दिवस, वातावरणाचा बदल ह्यामुळे शरीरात सहजपणे थकवा व इतर त्रासाच्या समस्या उद्भवत असतात त्यामुळे साहजिकच थोडंफार दुर्लक्ष होत असते. दोन तीन दिवसांनी तो मुंबई गेला आणि परत अस्वस्थ जाणू लागल्याने तो परवा सकाळी धुळे येथे येऊन शहरातील खाजगी रुग्णालयात स्वतःला दाखल करून घेतले. सर्व चाचणी अहवाल प्राप्तीनंतर त्याच्यावर उपचार सुरू होऊन त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले पण क्रूर नियतीला त्याची झुंज मान्य नव्हती आणि कर्माने उमदा असा धिप्पाड तरुणाला नियतीने हिरावून घेतले आणि त्याचा श्वास थांबला. ही घटना कुटुंबात व गावात पसरतात एकच टाहो फुटला.काल होता आणि आज अचानक नाही आहे हे अनेकांना पटतच नव्हते.कुटुंबाचा कर्ताधनी अविवाहित तरुण मुलगा सहज डोळ्यासमोर नाहीसा झाल्याने आई,वडील भाऊ बेभान झाले. गावात पार्थिव आल्यावर अनेक महिला व मित्र मंडळींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रत्येकाच्या मनात अश्रूंच्या धारा दिसून येत होत्या. माझा महेशसोबत मलाही बांधून पाठवून द्या असा हंबरडा आई वारंवार फोडत होती. महेशच्या जाणे अनेकांना पचनी पडणारे नव्हते. त्याच्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय पहावयास आला. मागील सात महिन्यापूर्वी महेशच्या घराशेजारील महेशचा मित्र गौरव देखील ऐन तारुण्यात अपघातात गमावला होता. एका गल्लीत लागोपाठ दोन तरुण मुले गेल्याने साहजिकच प्रत्येक आई हंबरडा फोडत होती. महेशने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सर्व काही केलं होतं.आई त्याच्या मेहनतवर कुटुंबाच्या चांगल्या दिवसाची स्वप्ने रंगवत होती. त्यांच्या गुण्या व विश्वासू स्वभावाने तो मित्रांच्या गळ्यातील ताईत बनला होता.पण महेशने भारतीय सैन्यात दाखल होण्याचे उराशी बाळगलेलं स्वप्न मात्र शेवटी नियतीने अपूर्णच ठेवले.