अमळनेर :- तालुक्यातील बोहरा येथील १७६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढत प्रांतांना निवेदन देण्यात आले.
पाडळसरे प्रकल्पामुळे बोहरा येथील काही कुटुंबे विस्थापित झाली असून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर गट) यांच्या नेतृत्वात प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बोहरा गाव हे तापी बोरी अनेर या नद्यांच्या संगमापासून ५०० मीटर अंतरावर वसले असून हतनूर धरणातून पाणी सोडल्यावर मोठा प्रमाणावर नदीला पुर येतो आणि काठावर राहणाऱ्या वस्तीला जीव मुठीत धरून पावसाळ्यात दिवस काढावे लागत असतात. काहीवेळा तात्पुरते स्थलांतर करावे लागते. दरवर्षी घरांची पडझड ही होत असते. २००६ मध्ये ही वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. मात्र शासनाने बोहरा या गावाला अंशत बाधित म्हणून घोषित केले आहे. वेळोवेळी पुनर्वसनासाठी निवेदने देवून हो शासनाने कोणतेही पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढून प्रांतांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, व बोहरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.