
भाजप श्रेष्ठींकडे पातोंडा ग्रामस्थांनी केली मागणी…
पातोंडा ता.अमळनेर:- नुकतेच जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे गटनिहाय आरक्षण सोडत झालेली असून अमळनेर तालुक्यातील सगळ्यात प्रभावी व मतदार संख्येने अधिक व तालुक्यातील लक्षवेधी असलेल्या पातोंडा अमळगाव जिल्हा परिषदेचे आरक्षण अनु.जाती महिला निघाले असून पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मोरे यांच्या कुटुंबातील महिला सदस्याला भाजपकडून संधी देण्याची मागणी पातोंडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी जोर करत आहे.
सागर मोरे हे गेल्या दहा वर्षांपासून पातोंडासह पंचक्रोशीत सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरणपूरक क्षेत्रांत भरीव कामगिरी करीत असून तळागाळातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देणे, विविध समस्यांना वाचा फोडून प्रशासनाशी संघर्ष करणे, विविध विषयांवर समाजात जनजागृती करणे, वंचित घटकांना घरकुले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये, समाज कल्याण योजने अंतर्गत महिलांना शिलाई मशिन, मिनी चक्की, शाळकरी मुलींना सायकल, शेतकऱ्यांना ताडपत्री, फवारणी यंत्रे, शेती अवजारे यंत्रे, गटई स्टॉल, संजय गांधी, इंदिरा गांधी योजना, अर्थसहाय्य योजना आदींसह अनेक योजनेचा लाभ त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहे. जलयुक्त शिवार, पाणी फौंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धा,मनरेगा व बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड, प्रबोधनात्मक पथनाट्ये अशा अनेक कामात त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आलेला आहे. सर्वसामान्यांच्या व्यथा समजून घेणारे एक गरीब कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण नेतृत्व म्हणून ग्रामस्थ त्यांच्याकडे बघून आहेत. सन 2015 मध्ये पातोंडा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत वयाच्या तेविसाव्या वर्षी अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांची कामगिरी पाहून तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व मा.आ.स्मिता वाघ यांनी पंचायत समितीच्या मागील पंचवार्षिक निवडणूकीत त्यांना भाजप कडून तिकीट मिळवुन देऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. काही अल्प मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. आता पातोंडा अमळगाव हा गट पूर्वीपासून रचला गेला असून तापी परिसर ह्या गटाला जोडला गेला आहे. हाच गट अनु.जाती महिला आरक्षित झाल्याने सागर मोरे ह्यांना पुन्हा संधी चालून आल्याने त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्याला त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा भाजपश्रेष्ठींकडून संधी देऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी पातोंडासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे. पंचक्रोशीत त्यांच्या कामाप्रती असलेला ठसा, उच्चशिक्षित, अभ्यासू,जिज्ञासू अस युवा नेतृत्व,पंचायत समितीतील पराभवाची सहानुभूतीची लाट, मागील उमेदवाराबद्दल नागरिकांमध्ये असलेली नाराजी ह्या सगळ्या बाबी सागर मोरे यांना अनुकूल असून मागील पंचवार्षिक पंचायत समितीचे पद गमावलेले मोठया मतांचे गठ्ठा असलेले पातोंडेकर ह्यावेळी जिल्हा परिषदेची संधी सोडणार नसून संपूर्ण गाव ताकदीने जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यास कुठलीही कसर सोडणार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.







