उत्सवाच्या काळात अनेक गावांना आले यात्रेचे स्वरूप…
अमळनेर:- संपूर्ण खान्देशाचे कुलदैवत असलेल्या कानुबाई मातेला तीन दिवसीय उत्सवात मारवड, गोवर्धन परिसरासह ग्रामीण भागात डीजे, ढोलताशांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढून नदीकाठी विसर्जन करून जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. तर वासरे येथे गावातील अपघाती निधन झाल्याने वाद्य न लावता कानुबाई मातेचे विसर्जन केले.
मारवड, गोवर्धन, भोरटेक, नांद्री-पातोंडा, शहापूर, वासरे, खर्दे, पाडसे, दहिवद आदी गावांमध्ये खान्देश वासीयांचे आराध्यदैवत कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात कामानिमित्त शहरात व बाहेरगावी राहणारे भाऊबंदकी, आप्तेष्ट व्यावसायिक असे सगळेच या सणाला एकत्रित गावी आले होते. त्यामुळे साहजिकच प्रत्येक गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होवून अनेकांच्या अनेक वर्षानंतर भेटीगाठी झाल्या. यात मारवड येथील मोठ्या भाऊबंदकित अनेक वर्षे बंद असलेला कानुबाई उत्सव यावर्षी उत्साहात पार पडला. यावेळी जुन्या गढीच्या भागात रानुबाई व कण्हेर भगवान यांच्या पुरातन मुर्त्या सापडल्याने त्या मूर्त्याची विधिवत पूजन करून कानुबाई उत्सव सुरू करून भाऊबंदकीतील सगळ्यांनी हिरीरीने सहभागी होत गावातील गल्लीबोळात मिरवणूक काढून घराघरात पूजन केले गेले, यामुळे मिरवणूक सकाळी निघाली तर दुपारपर्यत चालली.
अनेक गावात डीजे तसेच ढोलताशांच्या व बँडच्या तालावर खान्देशी लोकगीते,भक्तिगीते, देवीच्या आरत्या, गरब्याच्या तालावर , फुगडी पिंगा खेळत सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अबाल वृद्ध तरुण तरुणी यांनी मनसोक्तपणे फुगडी व नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यांनतर पूजा अर्चा आरती समाप्ती करीत नदीवर कानुबाई मातेचं सामूहिक आरती करून जड अंतकरणाने विसर्जन करण्यात आले. कानुबाई उत्सवाच्या काळात अनेक गावांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.