प्रताप तत्वज्ञान केंद्रात मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण…
अमळनेर:- तरूणांमध्ये शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक भान निर्माण होणे महत्वाचे आहे. क्रांतीकारक व समाज सुधारकांनी मोठ्या त्यागातून हे स्वातंत्र्य आपणास मिळवून दिले आहे. त्याची जाणीव सर्वांनी ठेवावी. स्पर्धेत सहभागी व्हा व प्रयत्न करून यश मिळवा असे प्रतिपादन अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानप्रसंगी आ.पाटील बोलत होते. या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.विजय तुंटे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,केंद्राचे कार्याध्यक्ष प्रा.सुधीर पाटील, मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार, विभाग प्रमुख प्रा.डॉ. राधिका पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
आ.अनिल पाटील पुढे म्हणाले की, आपल्या गाव पातळीवरील युवकांना सर्व क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक जबाबदारी घेण्याची तयारी ठेवावी. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचाही लाभ युवकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ.विजय तुंटे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अशा दोन्ही कालावधीतील परिस्थितीचा आढावा मांडला. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्या काळातील सामाजिक,
अध्यात्मिक, साहित्यीक व वृत्तपत्र या चळवळींचे मोठे योगदान आहे.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास हक्क व कर्तव्य प्रदान केले आहेत.आपण हक्काची चर्चा करतो पण आपण कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. क्रांतीकारकांचे बलिदान वाया जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येकाने देशविकासात योगदान देण्याचा संकल्प केला पाहिजे असे मत प्रा.डॉ.विजय तुंटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.राधिका पाठक यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे – पुरूष गट – मुकेश धनगर (प्रथम), मयुर पाटील (द्वितीय), नितेश वसावे (तृतीय), कृष्णा ठाकरे, मनोज पाटील (उत्तेजनार्थ)
महिला गट – अश्विनी काटोले (प्रथम), ज्योती महाजन (द्वितीय), पुजा भिल (तृतीय), सरला साळुंखे, भाग्यश्री पाटील (उत्तेजनार्थ)
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार यांनी तर सुत्रसंचालन सुवर्णा रायगडे यांनी केले. या प्रसंगी खा.शि.मंडळाचे संचालक विनोदभैय्या पाटील, निरज अग्रवाल, डॉ.अनिल शिंदे, सिनेट सदस्य दिनेश नाईक, सल्लागार समिती सदस्य प्रा. धर्मसिंह पाटील,प्रा.डॉ.धिरज वैष्णव, अभिजीत भांडारकर, ताहा बुकवाला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.नरेंद्र भोई, प्रा.दिनेश हालोर, पंडीत नाईक, विवेक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, उमेश अहिरराव, गिरीश चौधरी, बापू पाटील,गोपाल माळी,युनूस शेख,रईसा शेख आदींनी परिश्रम घेतले.