थकीत मोबदल्यासाठी निधी जिल्हा परिषदेला झाला प्राप्त..
अमळनेर:- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना एप्रिल २०२२ पासूनचा कामाचा थकीत मोबदला गणपतीपूर्वी अदा करावा अन्यथा दि.५ सप्टेंबर पासून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सातशे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद करण्याचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी जिल्हा परिषद आणि शासनाला दिला होता.
त्या अनुषंगाने दि.२९ रोजी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या जिल्हास्तरीय प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा समुह संघटक प्रविण जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.
सदर चर्चेत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी केलेल्या कामाचा एप्रिल २०२२ ते जून २०२२ या कालावधीचा आशा स्वयंसेविकांना दरमहा ३०००/- रुपये तसेच गटप्रवर्तकांना ४२००/- रुपये याप्रमाणे मोबदला तसेच ५००/- रुपये कोरोनो भत्ता यासाठी लागणारा निधी ३२५.९३ लाख रुपये जिल्हा स्तरावर प्राप्त झाले असल्याचे सांगितले आणि सदर रक्कम येत्या आठ दिवसांत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या सक्त सुचना तालुका स्तरावर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यालयाच्या ठिकाणी काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आरोग्य वर्धिनीचे एप्रिल २०२० पासूनचे थकीत मोबदला तात्काळ देण्याबाबतही चर्चा झाली. याबाबत पुन्हा तालुका आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कळवून सदर मोबदला देण्याबाबतही पत्र दिले जाईल असेही जगताप यांनी सांगितले. संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला यश आल्याचे रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.