देवळी येथील शरद खैरनार याची केंद्रीय संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून निवड…
अमळनेर:- ११ वर्षांचा असतांना वडिलांचे छत्र हरपले, त्यात घरची परिस्थिती हलाखीची, मायमाउलीने मोलमजुरी करून मुलाच्या शाळेची फी भरली, शिक्षण घेता-घेता दवाखान्यात काम करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. शेवटी त्याचे फळ मिळाले. ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर ही खऱ्या संघर्षाची कहाणी आहे.
अमळनेर तालुक्यातील देवळी येथे राहणाऱ्या शरद जगन खैरनार ह्या तरुणाने परिस्थितीचे सर्व बंधने तोडत गगन भरारी घेतली आहे. शरदची भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली आहे. यात कनिष्ठ लिपीकच्या संपूर्ण भारतातील १३ जागा होत्या त्यात खुल्या प्रवर्गात शरदने आपली एक जागा मिळवली असून त्याचे विशेष कौतुक होत आहे. शरद खैरनार ५ वीत असतांना म्हणजे ११ व्या वर्षीच वडीलांचे छत्र हरपले होते. म्हणून शरदची आई मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर शरद २०१५ पासून एका खासगी दवाखान्यात काम करत होता. त्यानंतर उच्चशिक्षित असल्याने गेल्या वर्षी त्याची कंत्राटी तत्वावर अमळनेर उपविभागीय तथा प्रांत अधिकारी कार्यालयात निवड झाली होती. व यावर्षी भारतीय संरक्षण मंत्रालयात दोन टप्प्यात परीक्षा झाली दोन्ही टप्प्यात शरद परीक्षा पास झाल्याने त्याचा निकाल गेल्या दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. संपूर्ण भारतातील १३ जागांमध्ये अमळनेर तालुक्यातील शरद खैरनारने आपली एक जागा निश्चित केली आहे. एवढी हलाखीची परिस्थिती असतांनाही शरदने हे यश संपादन केले त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.