
केळीच्या खोड्याच्या आधाराने जवळपास ५० किमी वाहत वाचविले प्राण…
अमळनेर तालुक्यातील निम येथे झाली महिलेचे सुटका…
अमळनेर:- चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील महिलेने बिबट्यापासून बचाव करण्यासाठी तापी नदीच्या पुरात उडी मारली आणि केळीच्या खोडाच्या आधारे प्राण वाचवत महिला जवळपास पन्नास किलोमीटर वाहून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील लताबाई दिलीप बाविस्कर (कोळी) ही महिला ९ रोजी सकाळी तापी नदी काठावरील स्वतःच्या शेतात शेंगा तोडायला गेली होती. साधारणतः चार वाजेच्या सुमारास एक कुत्रा तिच्या दिशेने धावत येताना दिसला आणि त्याच्या मागे बिबट्या शिकार करण्यासाठी पळत होता. लताबाई ने हे दृश्य पाहताच ती घाबरली. बिबट्या आपल्यालाही खाईल या भितीने तिने तापी नदीत उडी मारली. तापी नदीला पूर आला होता. लताबाईला पोहता येत असल्याने ती पोहू लागली आणि तिला केळीचे खोड वाहताना दिसले. लताबाईने त्या खोडाचा आधार घेतला. चोपडा तालुक्यातून वाहत वाहत लताबाई अमळनेर शिवारात आली. पाडळसरे धरण ओसंडून वाहत असल्याने त्याच्यावरून नदी पार करून निम शिवारात नदी काठाला लटकली. मात्र ती गळीतगात्र झाल्याने ती केळीच्या खोडाला धरून तशीच रात्रभर काठावर लटकून होती. १० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास निम मांजरोद दरम्यान नाव चालवणारे शंकर कोळी नदीवर आले असताना त्यांना एक महिला काठावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. भीमराव कोळी, मनोज कोळी, रामसिंग कोळी व मांजरोद येथील पौलाद कोळी यांनी त्यांना काठावर आणले. सुदैवाने लताबाईचे नातेवाईक निम गावात होते. तिकडे सोशल मीडियावरून लताबाई बेपत्ता झाल्याचा संदेश निम पर्यंत पोहचला होता. म्हणून लताबाईचा भाचा अशोक गटलू कोळी याला नदी काठावर आपली आत्या असल्याची खात्री झाली. तेथे जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने त्याने लताबाईला बाहेर काढले. तिला मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यावर डॉक्टर निखिल पाटील यांनी प्रथमोपचार केले. व त्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. सुमारे १५-१६ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नदीकाठी सुटका झाल्यानंतर महिलेला रडू कोसळले होते.
