
कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ करणार भजन आंदोलन…
अमळनेर:- जिल्हाभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले, तापी व पांझरेच्या संगमावर वसलेल्या कपिलेश्वर मंदिरजवळील जागेच्या वादातून संस्थेचे विश्वस्त व ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार आहेत.
तहसीलदारांना याप्रकरणी निवेदन देण्यात आले असून त्यात नमूद केले आहे की, श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराच्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची चौकशी नाशिक विभागीय महसूल कार्यालयात सुरू आहे. मात्र मुडावद येथील शिवाजी वाकडे यांनी कपिलेश्वर मंदिराजवळील आशापुरी मंदिरास तार कंपाऊंड केले असून अनधिकृत पणे जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. बोलायला गेल्यावर हमरीतुमरी ची भाषा केली जाते. शासकीय स्वच्छतागृहांचा रस्ता दादागिरी करत बंद केला आहे. आता तार कंपाऊंड केले आहे. याआधी ही तक्रार करण्यात आली होती मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सदर काम पोलीस बंदोबस्तात तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला होता. त्यामुळे आज १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर जमून संस्थानचे विश्वस्त तसेच पंचक्रोशीतील गावांचे ग्रामस्थ व भाविक भजन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.




