घरोघरी भेटी देऊन आशा स्वयंसेवीकाकडून सर्वेक्षण…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शासनाच्या आदेशानुसार कुष्ठरोग दुरीकरण कृती कार्यक्रमाच्या पंधरवाड्यास दि.13 पासून सुरवात झाली असून त्यासाठी आशा स्वयंसेवीका व आरोग्य सेवकांचे पथक नेमण्यात आले असून घरोघरी जाऊन कुष्ठरोग शोधमोहीम सर्वेक्षण त्यांच्याकडून सुरवात करण्यात आले आहे.
शासनाने दि.13 ते 30 सप्टेंबरपर्यंत कुष्ठरोग दुरीकरण कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.त्यानुसार पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्या महत्वकांक्षी मोहिमेची सुरवात करण्यात आली असून त्यासाठी आशा स्वयंसेवीका व आरोग्य सेवक कामाला लागले आहेत. घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची ते कुष्ठरोग व क्षयरोगाची तपासणी करून घेत आहेत.कुष्ठरोग व क्षयरोग संबंधी लक्षणांची ते तपासणी करत आहेत.लक्षणे असणाऱ्या रुग्णांची ते नोंदवहीत घेत आहेत. नागरिकांना कुष्ठरोग व क्षयरोग संबंधी लक्षणे व उपचार याची माहितीही पथकाकडून दिली जात आहे. सदर पथकाकडून ग्राम पंचायतीला भेट देऊन सदर कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रसार व माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी बी.वाय.पाटील,तलाठी धीरज देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.नागरिकांनी सदर रोगाबाबत घाबरून न जाता पुढे येऊन आरोग्य केंद्राकडून वेळोवेळी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपचार करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी शोधमोहीम पथकात आशा स्वयंसेवीका रंजना सोनवणे, दिपाली लोहारे, कविता वाघ, सुनिता बैसाने,आरोग्यसेवक अशोक देशमुख, संतोष जावरे आदींचा सहभाग असून वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन पाटील, डॉ.सुवर्णा संदानशिव, जळगावचे डॉ.शहा आदींनी देखील सर्वेक्षण दरम्यान पथकास भेट दिली. आरोग्य कर्मचारी संजीव पाटील, के.एम.वाडीले, शारदा शिरोळे, विशाल पाटील,सचिन शिरसाठ, देवा चावरे, कृष्णा मोरे आदींचे सहकार्य लाभत आहे.