ग्रामपंचायतीकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथे गेल्या महिनाभरापासून अंदाजे तीस ते चाळीस भटक्या कुत्र्यांची टोळी गावातील गल्लोगल्लीत हिंडत असून त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचाही समावेश असून त्यांच्या दहशतीने लहान बालके व नागरिक भयभीत झालेले असून ह्या भटक्या कुत्र्यांवर ग्राम पंचायतीकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गावांत अज्ञाताकडून भटक्या कुत्र्यांची टोळी सोडण्याचा प्रकार झाला असून अनेकवेळा असा प्रकार केला जात आहे.मात्र कुत्रे आणून सोडणाऱ्या टोळीचा अजूनही पत्ता लागला नाही. ग्राम पंचायत चौक, प्लॉट, भोईवाडा, माहिजी देवी रोड,मराठी शाळा परिसर, पोलीस चौकी व इतर अशा अनेक भागांत तीस ते चाळीस भटक्या कुत्र्यांची टोळीच्या टोळी एकसमान हिंडत आहेत. अनेक पिसाळलेली कुत्रे समाविष्ट असून त्यांच्यामुळे दुर्गंधी पसरत आहेत. आणि ह्या परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मराठी शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना ह्या भटक्या कुत्र्यांपासून प्रचंड धोका असून शाळेच्या आवारात देखील ह्या टोळ्या प्रवेश करत असल्याचे दिसून आले. पिसाळलेली कुत्री नागरिकांच्या थेट घरात प्रवेश करतात तर रात्रीच्या वेळी देखील कुत्री घरांच्या ओट्यावर घाण करून बसतात त्यामुळे घरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे महिलांना देखील ह्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. गल्लोगल्लीत लहान बालके खेळत असतात.पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वावरन्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर परिसरात मांस मच्छीचे दुकानेही असल्याने कुत्र्यांचा टोळीचा वावर ह्या परिसरात जास्त असतो. जर ह्या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान बालके,वृद्ध व्यक्ती अथवा नागरिकांना चावा घेतल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या कुत्र्यांच्या टोळीला सोडणाऱ्या व्यक्तींचा देखील ग्रामस्थांनी शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची गरज असून ग्राम पंचायतीने ह्या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करून अपेक्षित कारवाईची करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.