दोन्ही डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू, बाम्हणे फाट्यावर घडली घटना…
अमळनेर:- अमळनेर बेटावद रस्त्यावर पांझरा नदीच्या पुलापुढे बाम्हणे फाट्यावर एसटी बस व बुलेटचा अपघात होऊन अमळनेर तालुक्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक २३ रोजी घडली असून फरार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पाडसे येथील महेंद्र शांताराम बोरसे (वय ३९) व हिंगोणे खुर्द येथील अरुण नथु साळुंखे (वय ३८) हे दोन्ही डॉक्टर मित्र शिरपूर येथील मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी महेंद्र बोरसेच्या एम एच -१८, एव्हि-०३११ या क्रमांकाच्या बुलेटने पाडसे येथून बेटावद मार्गे शिरपूर कडे निघाले असताना बाम्हणे फाट्यावर हॉटेल माधवी समोर पांझरा नदीचा पूल पार करीत शिरपूर अमळनेर बस अमळनेरकडे जाणारी एमएच -२० बीएल- ३९८१ या क्रमांकच्या भरधाव बसने पुढे चालत असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याचा नादात बुलेट स्वार दोन्ही युवकांना उडविले. यात बुलेटचा चेंदामेंदा उडाला असून महेंद्र बोरसे व अरुण साळुंखे हे जागीच ठार झाले ही घटना अनेकांनी पाहिली. नेहमीच वर्दळीचा रस्ता असल्याने गर्दी जमा झाल्याचे पाहून बस चालकाने बस जागीच उभी करून पोबारा केला, पोलिसांना खबर मिळताच घटनास्थळी एपीआय जयेश खलाने, पीएसआय विनोद पाटील , सहाय्यक फौजदार किशोर पाटील. हवालदार विशाल चव्हाण यांनी धाव घेऊन दोन्ही डॉक्टरांना नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रविंद्र मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत फरार बस चालकाविरुद्ध रात्री भादवी कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहतूक कायदा कलम १८४, १३४( ब )१७७ अशा विविध आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील हे करीत आहेत.