अंगणवाड्यामध्ये लहान बालकांसाठी राबवितात विविध उपक्रम…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय पोषण आहार माहनिमित्ताने पातोंडा येथील सर्व अंगणवाड्यामध्ये लहान बालकांसाठी विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय पोषण आहार माह साजरा केला जात आहे.
सप्तश्रृंगी अंगणवाडी केंद्र, जागृती अंगणवाडी केंद्र, सरस्वती अंगणवाडी केंद्र,वैष्णवी अंगणवाडी केंद्र,आम्रपाली अंगणवाडी केंद्र आदी अंगणवाडी केंद्रामध्ये राष्ट्रीय पोषण आहार माह साजरा केला जात आहे. या माहनिमित्त लहान बालकांना पोषक व सकस आहार दिला जात असून त्यांना पोषक व सकस आहार बाबतीत माहिती दिली जात आहे. या उपक्रमात बालगोपाल पंगत आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये विविध फळे व फुले यांनी साकारून छान अशी रांगोळी सजविण्यात आली होती.तसेच बालकांना चांगल्या प्रकारे शिजविलेला पोषक मिष्ठान्न आहार खाऊ घालण्यात आला. पोषक आहाराविषयी गावात रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन पालक व वयोवृद्धांना राष्ट्रीय पोषक आहाराविषयी जनजागृती करून माहिती दिली. स्तनदा व गरोदर मातांचे लसीकरण,किशोरवयीन मुलींचे सभा घेऊन त्यांची हिमोग्लोबीन तपासणी करून घेतली. स्वस्थ बालक स्पर्धा घेऊन चांगले वजन व सदृढ असणाऱ्या बालकांना प्रमाणपत्र देऊन विविध बक्षिसानी गौरविण्यात आले आहे. पारसबाग निर्मिती विषयी माहिती व महत्त्व पटवून देण्यात आले. आहार घेण्याआधी स्वच्छ हात धुणे व वैयक्तीक स्वच्छतेविषयी देखील महत्व पटवून देण्यात आले. त्यांनतर गावातील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर बिरारी यांनी एका सामाजिक संस्थेमार्फत स्तनदा व गरोदर महिलांची एचआयव्ही चाचणी करून घेतली. जि.प. शाळा व श्री दत्त विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांची गावात मिरवणूक काढून योग्य पोषण देश रोशन अशा घोषणा देखील देण्यात आल्यात.अशा एक ना एक रोज विविध उपक्रमांनी राष्ट्रीय पोषण अभियान साजरा केला जात आहे.या अभियानामुळे लहान बालकांमध्ये नवचैतन्य पसरले असून त्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढले आहे. सदर अभियानात ग्राम पंचायत सरपंच, ग्रा.पं.सदस्य,वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींनी सहभाग नोंदविला. या सर्व अभियानाच्या यशस्वीतेसाठी मुख्य सेविका सुचिता चौधरी, अंगणवाडी सेविका सरला बाविस्कर, राजकुवर ढिवरे,अलकनंदा बिरारी, बेबीबाई पाटील,शैला पवार,उषा पवार, मदतनीस रजूबाई बिरारी, बेबीबाई साळुंखे, वंदना बाविस्कर, ललिता पवार आदी परिश्रम घेत आहेत.