
कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांचे आमरण उपोषण…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथून जवळच असलेल्या दहिवद येथे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस व नुकसान करणाऱ्या गाव डुकरांच्या कायमचा बंदोबस्त करावा ह्या मागणीसाठी दहिवद येथील शेतकरी आमरण उपोषणास बसले असून त्यासंबंधीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले असून वेळेत कार्यवाही न झाल्यास तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवू असा निर्धार देखील शेतकऱ्यांनी केलेला आहे.
दहिवद येथील गावाच्या वेशीवर शेत-शिवारात दरवर्षी गावांतील मोकाट फिरणारे डुकरे शेतातील उभ्या पिकांची नासधूस करत असून त्यांचा उभ्या पिकांत कायमच हैदोस सुरू असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक हानी होत असते. शेतात मका,कपाशी,बाजरी,ज्वारी, भाजीपाला व इतर अनेक पिके शेतकरी घेत असतात. ह्या पिकांची नेहमी डुकरांकडून हानी होत असते.हाती आलेला शेतमाल डुकरांमुळे वाया जात असतो व आमच्या एकमेव उत्पन्नाचे साधन शेती असून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे आमचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन देखील करावा लागत आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी वेळोवेळी डुकर मालकांकडे तक्रार करुनही त्यांच्याकडून डुकरांचा योग्य तो बंदोबस्त केला जात नसून उलटपक्षी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खोट्या केसेसच्या धमक्या देण्याचा प्रकार व आमच्या पशुधनाच्या मारण्याची धमकीवजा प्रकार केला जात असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी संबंधित कार्यालय प्रमुखांना तक्रारी देऊनही अद्यापही कुठलीच दखल आजपर्यंत घेतली गेली नाही. म्हणून शेतकरी बांधव मंगळवार पासून ग्राम पंचायतच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत योग्य ती उचित कार्यवाही डुकरांवर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. यासंबंधीचे निवेदन सुनिल पाटील व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, आमदार, जिल्हाधिकारी, वनक्षेत्रपाल अमळनेर व पारोळा,तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलेले आहे.







