
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथून जवळ असलेल्या तापी नदी काठावरील वसलेल्या रुंधाटी येथे महाराष्ट्रातील साती राणा देवाचे एकमेव मंदिर असून मंदिरात वंशपरंपरागत पाचशे वर्षांपासून चालत आलेल्या रूढीप्रमाणे व नित्यनियमाप्रमाणे पूजा अर्चना केली जात असते. सदर काळभैरव मंदिर भाविकांचे मनोकामना पूर्ण करणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहे.तसेच धार पवार कुळाचे ग्रामदैवत म्हणून देखील ह्या मंदिराला ओळख आहे. पुरातन काळापासून हे देवस्थान प्रचलित देवस्थान आहे. नवरात्रोत्सव काळात घटस्थापनेच्या दिवशी नियमांप्रमाणे भाविक वाजत गाजत पहिले माती आणतात नंतर सुर्यपुत्री तापी नदीतील पाण्याचे घट भरून मंदिरात आणले जाऊन अखंड नऊ दिवस ज्योत प्रज्वलित ठेवण्यात येत असते.मंदिराचे सेवेकरी दिलीप पवार हे मंदिराची मनोभावे सेवा करीत असतात. नवरात्रोत्सव काळात काळभैरव देवस्थानचे भाविक नित्यनियमाने दर्शनासाठी येत असतात.




