पंधरा जणांविरुद्ध दरोड्याचा व खंडणीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- तपासणीसाठी घेतलेली फी परत करा, १० हजार रुपये द्या नाहीतर तुमच्यावर खोटा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू, असे सांगत दवाखान्याची तोडफोड केल्यावरून दहा ते पंधरा जणांविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न व खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नर्मदा फाउंडेशन मधील महिला डॉ. हर्षल देवदत्त संदानशीव यांनी फिर्याद दिली की, दिनांक २३ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास डॉ अनिल शिंदे केबिन मध्ये रुग्ण तपासणी करत असताना ममता मनोज भिल ही महिला पोटात दुखत असल्याने तिची आई सोबत आली. त्यावेळी डॉ परेश पाटील, कंपाऊंडर संदीप पाटील व मी हजर असताना डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्यावर त्या महिलेने खोटा आरोप करत दवाखान्याबाहेरील मेडिकलजवळ गुलाब बोरसे, नरेश रतीलाल भिल, रवी वाघ यांच्यासह १५० ते २०० लोक बोलावून घेतले. त्यावेळी तिन्ही लोकांसह काही जण घेतलेली फी परत करा नाहीतर खोटा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. तसेच आताच दहा हजार रुपये रोख द्या नाहीतर दवाखान्याची तोडफोड करुन तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. त्यावेळी डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी डॉक्टरांच्या ड्रॉवरमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या वडिलांनी लोखंडी स्टँड उचलून डॉक्टरांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा परेश पाटील व संदीप पाटील यांनी ते हिसकावून घेतले. त्यांनी रागाच्या भरात लोखंडी खुर्ची उचलून ड्रेसिंग टेबलची मोडतोड केली. डॉ. हर्षल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला ममता भिल, तिची आई, तिचे वडील गुलाब बोरसे, नरेश भिल, रवी वाघ यांच्यासह दहा ते १५ लोकांवर दरोड्याचा प्रयत्न आणि खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.