आमदार रोहित पवार यांचे ‘साहेबांचा संदेश’ संवाद मेळाव्यात प्रतिपादन…
अमळनेर:- भाजपचे विचार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविणारे आहेत. शेतकरी, कष्टकरी, मतदार यांना विसरणाऱ्या स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. २०२४ ला क्रांती होणार आहे आणि त्या क्रांतीचे जनक युवा असतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित ‘साहेबांचा संदेश’ या संवाद मेळाव्यात बोलताना केले.
व्यासपीठावर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जयदेव गायकवाड, माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, रविकांत वरपे, महेश तपासे, राजा राजापूरकर, कविता म्हेत्रे, पंकज बोराडे, उमेश पाटील, रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष शाम पाटील हजर होते.
रोहित पवार पुढे म्हणाले की, आपल्याला लढायचे आणि जिंकायचे आहे. संघर्षाची सुरुवात झाली आहे. तुमचा मंत्री हवेत गोळी मारणारा नेता आहे. तीन मंत्री असूनही दुष्काळाबाबत आढावा बैठक नाही. तालुक्यात परिवर्तनाची संधी आहे, त्यासाठी येत्या पाच तारखेला दुपारी दोन वाजता सागर पार्क वर हजर रहावे, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले. माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील म्हणाले की, स्वाभिमानाचा मंत्र मी शरद पवारांकडून शिकलो, मलाही भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर होती. मी निष्ठेला कधी बगल दिली नाही. मात्र शरद पवार माझ्या गळ्यातील ताईत आहेत. त्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल ते हात कापले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. तिलोत्तमा पाटील यांनी पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला कलंक लागताना दिसत आहे. त्यासाठी आपल्याला धनशक्तीविरोधात लढायचे आहे. असे आवाहन केले.
प्रास्ताविक करताना सचिन पाटील यांनी थेट मंत्री अनिल पाटील यांना आव्हान देत २०२४ला मंत्री अनिल पाटील पराभूत होतीलच, असे सांगून जर पराभूत झाले नाहीत तर मी राष्ट्रवादी कार्यालयात पाणी भरेल. यावेळी रोहित पवार यांना शेतकऱ्यांचा आसूड (चाबूक) , बैलगाडी, बॅट भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. संवाद मेळाव्यास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम पाटील, वेदांशु पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, विजय पाटील, काँग्रेसचे महेश पाटील, योजना पाटील, हर्षा चित्ते, ऍड शकील काझी, अरुण शिंदे, दर्पण वाघ, मनोहर पाटील, सचिन वाघ,मुशीर शेख, सनी गायकवाड,संजय पवार, अक्षय चव्हाण यांच्यासह ग्रामीण भागातील व शहरातील अनेक कार्यकर्ते हजर होते. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.