
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात दि. ७ रोजी कबचौ उमवि संलग्नित महाविद्यालयांच्या एरंडोल विभाग क्रीडा समितीची प्रथम सभा पार पडली.
यावेळी ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा स्वागत समितीचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील यांच्या उपस्थितीत एरंडोल विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ वसंत देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे, सचिव देविदास बारकू पाटील. संचालक डॉ. सुरेश मन्साराम पाटील. एरंडोल विभागाचे सचिव क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील हे विराजमान होते. सभेची सुरुवात प्रतिमा पूजन व उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारंभाने करण्यात आली. सभेच्या प्रास्ताविकात एरंडोल विभागीय क्रीडा समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी एरंडोल विभागीय क्रीडा समितीचे यजमानपद महाविद्यालयाला दिल्याबद्दल कुलगुरू व विद्यापीठ क्रीडा विभाग संचालक प्रा. डॉ. दिनेश पाटील याचे आभार मानले. तसेच विद्यापीठ निर्देशीत एरंडोल विभागाच्या विविध क्रीडा स्पर्धा महाविद्यालय यशस्वीरीत्या आयोजित करेल अशी भुमिका मांडली. याप्रसंगी जेष्ठ क्रीडा संचालक डॉ. शैलेश पाटील यांनी एरंडोल क्रीडा विभागाची कार्यपद्धती व क्रीडा प्रकारांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयाला विद्यापीठाने एरंडोल विभागाचे यजमानपद दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. त्याच बरोबर एरंडोल विभागाच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी महाविद्यालय व संस्था योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन दिले. स्वागत समारंभानंतर एरंडोल विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ वसंत देसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची प्रथम सभा संपन्न झाली. सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, विविध पदाधिकाऱ्यांची निवड, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांसाठी निवड समिती, स्पर्धांचे ठिकाण व दिनांक, प्रोरेटा फी, लेखापरीक्षकाची नेमणूक, आयत्यावेळेच्या प्रश्नांवर चर्चा करून सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर सभेचे सुत्रसंचलन अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी तर आभारप्रदर्शन क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी केले. सभेचे इतिवृत्त लेखन सचिन पाटील यांनी केले. सदर सभेसाठी एरंडोल विभागातील सर्व क्रीडा संचालक व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




