डंपर सोडण्याच्या बदल्यात दीड लाख लाचेची मागणी भोवली…
अमळनेर:- डंपर सोडण्याच्या बदल्यात दीड लाख लाचेची मागणी करणाऱ्या अमळनेरातील दोन तलाठ्यांना अँटीकरप्शनने रंगेहाथ पकडल्याची घटना काल दुपारी घडली आहे. दरम्यान बडे मासे सुटले, मोहरे अडकल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर (क्रं. एम एच 18 एए 1153) हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापूर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे तलाठी गणेश महाजन आणि मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे यांनी पंचासमक्ष दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. यानंतर सदर रक्कम तलाठी गणेश महाजन यांना स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. हि कारवाई शशिकांत एस. पाटील (पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स. फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो. ना. जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना. बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो. कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी यांनी केली.
बडे मासे सुटले, मोहरे अडकले….
दरम्यान भर दिवसा झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. तरी तहसील आवारात लावलेले डंपर सोडण्याचा निर्णय फक्त तलाठी व मंडळ अधिकारी घेवू शकत नाही. यामागे असलेले बडे मासे या कार्यवाहीतून सुटले असले तरी अनेकांच्या ते लक्षात आले आहे. राजरोसपने रात्री बेरात्री खाजगी वाहनातून चार पाच जणांची टोळी जोगवा मागत फिरत असते. सेटलमेंट झाली तर जागीच सोडायचे अन्यथा कारवाई केली असे दाखवत गौण खनिजाचे वाहन जमा करायचे, असा गोरख धंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अश्या कामांना वरिष्ठांचा आशीर्वाद असून त्यात त्यांचाही कट असल्याचे आता उघडउघड बोलले जात आहे.