
मंत्री गुलाबराव पाटील, आ. अमरीशभाई पटेल यांना दिले निवेदन…
अमळनेर:- दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी निम मांजरोद पुलास निधी मिळावा म्हणून मांजरोद ग्रामपंचायतीने आता मंत्री व आमदारांना साकडे घातले आहे.

निम मांजरोद पुलासाठी मंजुरी मिळाली होती व सर्वे ही पार पडला होता. मात्र निधीअभावी हे काम रद्द करण्यात आल्याचे समजल्याने दोन्ही बाजूच्या गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. ह्या पुलाचे काम झाल्यास दोन्ही तालुके जोडले जाणार असून दळणवळणाच्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. ह्या पुलाचे काम तापी खोरे अंतर्गत न करता निधी आणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार अमरीश पटेल, शिरपूर मार्केट कमिटी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया यांना निवेदन देतेवेळी मांजरोद गावाचे लोकनियुक्त सरपंच भुलेश्वर पाटील, जि.प. सदस्य प्रा.संजय पाटील. थाळनेर गावाचे मा. सरपंच एकनाथ सिंग जमादार, वि.का.सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे व परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.




