ग्रामरोजगार सेवक पदावरून कमी केल्याने केला प्रकार…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील तरुणाने काल दिनांक १० नोव्हेंबर रोजी पंचायत समिती आवारात रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पोलिसांनी रोखले.
याबाबत अधिक माहिती अशी की, झाडी ग्रामपंचायतीत ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले संदीप भावराव पाटील यांना ग्रामपंचायतीने कसलीही नोटिस अथवा पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले. संदीप पाटील गेल्या बारा वर्षांपासून ग्राम रोजगार सेवक म्हणून कामावर होते. तेव्हा पासून संदीपचा परिवार याच्या मानधनावर चालत होते. मात्र ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतल्याने त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून या सर्व बाबींना कंटाळून येत्या 10 नोव्हेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे पत्र तालुका प्रशासनाला दिले होते. मात्र त्यावर कोणताही मार्ग न निघाल्याने काल तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना उपस्थित पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढत त्वरीत चौकशी करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच मारवड पोलिसांकडून सदर तरुणास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे.