अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे लोकनेते कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांना विविध संस्थांमध्ये त्यांच्या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी सकाळी मारवड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात न्हानाभाऊ यांच्या तैलचित्रास गोवर्धनचे मा. सरपंच देविदास आबाजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात कै. न्हानाभाऊ यांच्या तैलचित्रास ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष देविदास साळुंखे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. करणखेडा येथील वि. या.पाटील माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संचालक विश्वासराव पाटील, संचालक लोटन पाटील यांनी न्हानभाऊंच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. मारवड येथे कला महाविद्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना सु.ही.मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लोटन चौधरी यांनी कै. न्हानाभाऊ यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. लोकनेते न्हानभाऊ यांनी मारवड विकास संस्थेची स्थापना करून चेअरमन म्हणून सुमारे 35 वर्षे धुरा सांभाळली. तसेच मारवड गावाचे 20 वर्ष सरपंच पद, अमळनेर तालुका शेतकी संघाचे अध्यक्षपद, तसेच जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदे भूषवून तेथे आपल्या कार्याची छाप पाडली होती. ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या संस्थापनेमुळे त्यांनी गावात व परिसरात शिक्षणाची गंगा आणली होती. गावातील पाणीटंचाई संदर्भात त्यांनी त्याकाळात केलेले काम आजही जनमानसांच्या तोंडी आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास मारवड व परिसरात विविध संस्था व नागरिक यांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण करून त्यांना भावपूर्ण पुष्पांजली अर्पण केली.