मंत्री महाजन यांना निवेदन देत केली आग्रही मागणी…
अमळनेर:- दोन तालुक्यांना जोडणाऱ्या व पंचक्रोशीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम मांजरोद पुलाला निधी मिळून काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी करत मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले.
तापी नदीवर निम मांजरोद पुलास तापी खोरे अंतर्गत पाडळसे धरणाच्या खाली शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. सदरचा पुल झाल्यास अमळनेर व शिरपुर तालुक्याच्या विकासास अधिक चालना मिळून दोन्ही तालुक्यातील नागरिकांना दळणवळण करणे सोपे होणार आहे. या मार्गामुळे अमळनेर ते शिरपूर अंतर २० किमीने कमी होईल. तसेच चाळीसगाव ते इंदोरचे अंतर ४५ किमीने कमी होणार आहे. शिवाय हायवेवरील ट्रॅफिक विभागली जाणार आहे. पाडळसरे धरणास पुरेसा निधी प्राप्त होत नसल्यामुळे धरणाचे काम निधीविना खोळंबले आहे. त्यामुळे तापी विकास महामंडळा कडुन सदर पुलाचे काम काढुन सार्वजनिक बांधकाम विभागा कडे वर्ग करावे व निधी उपलब्ध करून पुलाचे काम लवकरच सुरु करावे. शासनास निधी उपलब्ध करणे शक्य नसल्यास बिओटी तत्वावर का असेना पण पुलाचे काम लवकर सुरु करावे अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी माजी आमदार स्मिता वाघ नागरी हित दक्षता समितीचे कार्याध्यक्ष मगन वामन पाटील ( मगन भाऊसाहेब), निम येथील सरपंच भगवान दगा भिल, सामाजिक कार्यकर्ता तुकाराम धोंडु चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
निम मांजरोद पुलासाठी लोकचळवळ उभी राहणार…
निम मांजरोद पुलामुळे तापी नदीमुळे विभागलेले दोन्ही तालुके जवळ येणार असून दळणवळण सोयीस्कर होणार आहे. वाहतूक वाढल्यामुळे रस्त्यावरील मारवड, कळमसरे, निम या गावातील व्यावसायिकांना लाभ होणार असून अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. तसेच मुख्य रस्त्यावरील गावांना महत्त्व येणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी पुलासाठी परिसरातून लोकचळवळ उभी राहणार असल्याची चिन्हे आहेत.